समाजामध्ये प्रत्येक मुलीस / स्त्रीस शांततेत समानतेचा तसेच शांततामय व आदरपुर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे

आमचे धोरण आणि दृष्टिकोण - तरुण मनांना शिक्षित करणे

औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील युवक- युवतीमध्ये सामाजिक लिंगभेद या विषयाबद्दल अधिक जनजागृती होण्यासाठी व युवकांमध्ये मुली व महिला यांचे प्रति समानाची व समानतेची भावना निर्माण व्हावी या अनुषंगाने पथक शाळा, महाविद्यालये यांना भेटी देवुन मुलगा- मुलगी या भेदभावाचे परिणाम किती वाईट होतात याची जाणीव व्हावी याकरीता हसत खेळत विविध खेळांच्या माध्यमातुन त्यांचे विचारांचे प्रबोधन करतात. सदर खेळांच्या माध्यमातुन विशिष्ठ संदेश दिला जात असल्याने ते कायम मुलां- मुलींच्या मनात राहतात. यामुळे त्यांचेकडुन चांगल्या व सुजाण नागरिकांप्रमाणे सकारात्मक कृती होण्याची सुनिश्चिती होते. 

ध्येय आणि उद्दिष्टे

 औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीसांनी सामाजिक लिंगभेद नष्ट होवुन तरुण- तरुणीमध्ये एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, ज्यामधुन सर्वांना समान अधिकारांची जाणीव होवुन समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुलभ होवुन सुरक्षित समाजाच्या निर्मिती व्हावी या करीता पुढाकार घेवुन हाती घेतलेला अभिनव उपक्रम म्हणजे " अभिन्न ". महिला व मुली विरुध्दचे घडणारे अत्याचाराचे गुन्हे बघता हे बलात्कार, घरगुती हिंसाचार, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, हुंडाबळी व कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अशा विभिन्न गंभीर स्वरुपाचे असतात, या अनुषंगाने किशोरवयीन मुली आणि मुलांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आनण्यासाठी तसेच त्यांचे मनात व वागणुकीमध्ये समानतेची सकारात्मक भावना निर्माण करुन सामाजिक लिंगभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याकरीता परिश्रम घेणे. 

मानसिकतेत बदल घडवून आणणे

महिलांविरुध्द घडणारे हिंसाचाराचे गुन्हे बघता हे समाजाकडुन महिला व मुलींना दुय्यम दर्जाने बघण्यात येणाऱ्या दृष्टिकोनातुन उद्भवतात. तारुण्यातील मुलांच्या डोक्यातील विचार चांगल्या मार्गाला वळवुन, त्यांना चांगले वाईट या बाबींची वेळीच जाणीव करुन दिल्यास आपल्याला गुन्हा मुक्त समाज म्हणुन प्रवास करणे सुकर होईल. आम्ही “ अभिन्न " च्या माध्यमातुन आम्ही अशी भयानक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. महिलांना कनिष्ठ समजण्याची मानसिकता पुसली गेली पाहिजे. तरुण मनांना या कल्पनांचा पुनर्विचार व पुर्नमुल्यांकन करण्यास शिकवणे तसेच असे विचार प्रथम का जन्मतात हे समजुन घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

शाळा व महाविद्यालयात जनजागृती

सदर उपक्रमादरम्यान मुख्यत: शाळा व महाविद्यालयाना भेटी देवुन ईयत्ता 8 वी ते ईयत्ता 10 वी व त्यावरील वर्गात शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना सामाजिक लिंगभेद या विषयांबाबत प्रभोधन करुन त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जातो. कारण हीच मुले उद्याची सुजाण नागरिक आहेत. अशा मुलांना त्यांना सांगितलेल्या गोष्टींचा मतितार्थ योग्यप्रकारे समजतात व ते योग्य रितीने आत्मसात करु शकतात. 

अक्षरा स्वयंसेवी संस्था

सदर उपक्रम तयार व प्रत्यक्षात अंमलात आणणे यामध्ये बहुमुल्य मदत केल्याबद्दल आम्ही मुंबई येथील अक्षरा या स्वयंसेवी संस्थेचे मन: पुर्वक आभार मानु इच्छितो, अक्षरा या स्वयंसेवी संस्थेने आमचे पथकास लैंगिक समानतेबद्दल आणि तरुण मुली व मुलांबरोबर कशा प्रकारे संवाद साधावा या बाबत मार्गदर्शन केले आहे.

पथकास प्रशिक्षण

तरुण मुली व मुलांच्या विचारामध्ये सकारात्मक बदल घडवुन सुरक्षित समाजाची निर्मिती करणे या अनुषंगाने समन्वयाने पुढाकार घेवुन प्रभावीपणे जन- जागृती करता येईल या उद्दिष्टाने पथकास सामाजिक लिंगभेद बाबत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

ध्येय निश्चिती

सामाजिक लिंगभेद या समस्येबाबत सर्वांनी सजग च जागरुक होण्याची आवश्यकता आहे. ज्यायोगे सर्व या विषयावर सकारात्मक विचार करुन आणि त्यावर योग्य ती कृती करु शकतात व सुरक्षित समाजाची निर्मीती होणे शक्य होईल. महिला अत्याचाराचे घडणाऱ्या घटनांकडे बघता सदर घटनांमध्ये पिडीतेच्या मनावर होणारे परिणाम, दुःख, वेदना तसेच सदर घटनांमध्ये तिचे भविष्यावर होणारा परिणाम याबाबत आपणांस निश्चितच जाणीव होणे आवश्यक आहे. आपण समाजातील चुकीच्या विचारांचा दृष्टिकोण व गुन्हेगारी विचार हे मिटवलेच पाहिजेत. तरच आपण सर्वजण आपल्या समाजात शांततेने व सुरक्षितपणे व एकत्रित राहू शकतो.

स्त्री व पुरुष यांची निर्मिती जरी वेगळ्या स्वरुपात झालेली आहे, आपली शरीरे जरी वेगळी आहेत, परंतु शेवटी आपण सर्वजण मनुष्यप्राणी म्हणुन एकच आहोत. आपल्या भारतीय राज्यघटनेनेही आपणा सर्वांना समानतेचा अधिकार, मतदानाचा अधिकार, समान वागणुकीचा अधिकार, समान वेतनाचा अधिकार असे व ईतर समान अधिकार दिलेले आहेत, हे आपण सर्वांना ज्ञात आहे आणि आपण स्त्री- पुरुष समानतेबाबत आपले विचार विविध स्वरुपात मांडत असतो. परंतु ज्यावेळी सदर विचार आपल्या कृतीतुन आणि वागण्यातुन आपल्या सर्वांना प्रत्यक्षात आचरणात आनण्याची वेळ येते त्यावेळी आपण या गोष्टी विसरुन जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरुण मुली व मुले हे आपले विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून एकमेकांविषयी समानतेची आदराची भावना निर्माण करुन सुरक्षित समाजाची निर्मीती करु शकतील.

Marathi